'अवखळ तू, नाजूक तू,कोणी म्हणे जाज्वल्य तू, कोणी म्हणे रणरागिनी तू,पण मनीचे द्वंद्व सांगते घे स्वप्नांचा ध्यास तू'. या कवितेप्रमाणे तरुणीचे पहिले पाऊल हे तारुण्यात सौंदर्याच्या पायरीवर असते पण दुसरे पाऊल हे स्वप्नांचा ध्यास घेत असते.
                       सध्याचा काळ हा Beauty with Brain चा आहे त्यामुळे सडसडीत अंगकाठी सोबत स्वप्नांचे आकांक्षाचे ओझे कसे सांभाळले जाईल हे आज बहुतेक तरुणींना समजले नाही. हे असे म्हणायची वेळ येते कारण आजकाल महिलांना बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते. त्यातच आधुनिक जगातील आजार म्हणजे पीसीओडी(PCOD) किंवा पीसीओएस(PCOS). आज पीसीओडी चे प्रमाण सर्वाधिक महिलांमध्ये दिसून येते.परंतु याबाबत बहुतेक महिलांना माहिती नसते. त्या बद्दल थोडी माहिती घेऊ या.

PCOD (PolyCystic Overian Disease) म्हणजे काय?

      स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित हा आजार आहे. महिलेच्या बीजांडकोषात अनेक छोटी-मोठी बीजांडे असतात.त्यातील बीजांड मोठे व्हायला सुरुवात होते व त्याची पूर्ण वाढ होऊन ते तयार झाले की बीजांड फुटून त्याचे बीज बाहेर पडते व बीजवाहि नलिकेतून त्याचे वहन केले जाते.पण कधीकधी या बीजांडाची वाढ पूर्ण न होता ते बाहेर न पडता साठायला सुरुवात होते. व त्याच्या गाठी बनतात.अशा गाठी जास्त प्रमाणात साठून जो आजार होतो त्याला पीसीओडी म्हणतात.ज्यामुळे वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळा येतो. पीसीओडी मध्ये इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या अंत:स्रावांचे संतुलन बिघडलेले असते.



         आजच्या युगात दहापैकी एक  महिला या आजाराने त्रस्त आहे.या आजाराच्या 10 ते 15 टक्के स्त्रियांना वंध्यत्वा सारख्या  समस्येला सामोरे जावे लागते.ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असेल त्यांनी पीसीओडी ची तपासणी करणे आवश्यक आहे.गर्भनिरोधक गोळ्यांमुळे या गाठी तयार होण्याची शक्यता किंवा प्रमाण जास्त असते.या गोळ्यांमुळे बीजांड फुटण्याची प्रक्रिया बंद केली जाते व गर्भधारणेस प्रतिबंध होतो.जर ही प्रक्रिया जास्त काळ बंद राहिली तर स्त्रीला वंध्यत्व येते.
1. अनियमित मासिक पाळी,रक्तस्त्राव कमी होणे,मुलगी वयात येऊनही मासिक पाळी न येणे.
2. चेहऱ्यावर हात-पायांवर केसांची वाढ.
3. मासिक पाळीतील वेदना.
4. केस गळणे.
5.चेहऱ्यावरील पुटकुळ्या.
6.गर्भ न राहणे.
7.त्वचेवरील वांग.
8.लठ्ठपणा (वजनात अति प्रमाणात वाढ होणे).


     हा आजार अनुवंशिकतेने आईकडून मुलीला येऊ शकतो.जर आईने मुलीच्या जन्मापूर्वी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीतील मुलीवर होतो.

 PCOD चे निदान :-
    PCOD चे निदान सोनोग्राफी व रक्ताच्या काही टेस्ट घेऊन केले जाते.त्यात एएमएच(AMH- Anti Mullerian Harmon Test)) ही तपासणी महत्त्वाची आहे. पीसीओडीत याचे रक्ताचे प्रमाण वाढते.यावरून प्रेग्नेंसी चे किती chances आहेत हे कळते. तसेच फॉलिकल सिम्युलेटिंग हॉर्मोन्स (Follicle Stimulating Hormone) ,ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स (Luteinizing hormone), टेस्टॉस्टेरॉन (Testosterone)अशा काही हॉर्मोन्स टेस्ट उपलब्ध आहेत.

PCOD/PCOS चे योग्य निदान न झाल्यास खालील समस्या निर्माण होतात :-
1. वंधत्व
2. गर्भाशय अंत:स्थराचा कर्करोग
3. यकृताचे विकार
4. गर्भाशयाचा कर्करोग
5. हृदयरोग
6. मधुमेह प्रकार २
7. उच्चरक्तदाब
8. झोपेतील श्वसनाचा त्रास

PCOD वरील उपाय :-
•  सर्वात प्रथम वजन नियंत्रित करणे.त्यासाठी काही व्यायाम प्रकार योगा करणे.
जंकफूड खाणे टाळणे.योग्य आहार घेऊन हार्मोन्सचे संतुलन राखणे.मेथी व आळशी यांच्या बिया हार्मोन्सचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत करतात असे तज्ञांचे मत आहे.
• आधुनिक उपचार पद्धतीत हार्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात पण त्याचे दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अधिक असते.गोळ्या बाहेरून घेण्यापेक्षा ते हार्मोन्स शरीरानेच तयार केलेले योग्य.
• दुसरे म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने गाठी फोडल्या जातात.परंतु यातही गाठी पुन्हा येऊ शकतात.


आयुर्वेदिक उपचाराने अनेक रुग्णांना या आजारापासून सुटका मिळाल्याचे दिसते. नैसर्गिक औषधांनी हार्मोन्स संतुलित होऊन बीज कोषातील बीज फुटण्याची प्रक्रिया सुरळीत चालू होते व गर्भधारणा होते.ही उपचार पद्धती लाभदायक असून कमी खर्चिक आहे व त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत.

PCOD/PCOS साठी काही योगासने :-
1.तितली आसन | Butterfly Pose



2.सुप्त बद्धकोणासन | Supta  Badhakonasana




3.भारद्वाजासन | Bharadvajasana



4.चक्की चलनासन | Chakki Chalanasana


5.शवासन | Shavasana 

6.पद्म साधना | Padma Sadhana
7.सूर्य नमस्कार | Surya Namaskar



8.सुदर्शन क्रिया । sudershan kriya




       PCOD हा चिरकाल टिकणारा आजार असल्याने योग्य उपचार न झाल्यास अनेक वर्ष किंवा आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.हा आजार बिघडलेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे.त्यामुळे आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करून यापासून वाचता येईल.